ओळख आणि संस्कृती

साजरे होणारे सण

गावामध्ये घरगुती गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक घरात मातीचा गणपती बसवून सुंदर सजावट, आरत्या, भजन-कीर्तन आणि मोदकांचा प्रसाद यामुळे वातावरण भक्तिमय होते. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन पूजा करतात, शेजारीपाजारी भेटतात आणि एकोपा वाढवतात. काही घरांत दोन, पाच किंवा अकरा दिवस गणपती ठेवण्याची परंपरा असते. शेवटच्या दिवशी “गणपती बाप्पा मोरया, पुन्हा लवकर या!” या जयघोषात विसर्जन केले जाते. हा सण श्रद्धा, परंपरा आणि आनंदाचा संगम मानला जातो.

शिमगा किंवा शिमगोत्सव हा कोकण भागात साजरा होणारा पारंपारिक सण आहे. हा होळीच्या काळात येतो आणि आनंद, नृत्य, गाणी व रंगोत्सवाने भरलेला असतो. गावातील लोक पारंपरिक वेशात नाचतात, ढोल-ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढतात आणि एकमेकांवर रंग उधळून सण साजरा करतात. शिमगा हा फक्त होळी नव्हे, तर गावातील एकोपा आणि परंपरेचे प्रतीक आहे.

दिवाळी मोठ्या आनंदात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. घरांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सुंदर रांगोळ्यांनी सणाची सुरुवात होते. नरकचतुर्दशीला आंघोळीनंतर सुगंधी उटण्याचा वापर करून अभ्यंग स्नान केले जाते, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी वर्ग आपापल्या देवघरात व दुकानात लक्ष्मीची पूजा करतात. फटाके, दिव्यांची रोषणाई, आणि घरगुती फराळाचा सुगंध गावागावांत दरवळतो. दिवाळी म्हणजे नातेवाईक, शेजारी आणि मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा, प्रकाश आणि प्रेम पसरवण्याचा सण आहे.

गुढीपाडवा हा सण नववर्षाच्या स्वागताचा आणि आनंदाचा प्रतीक म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक घराच्या दारात रेशमी वस्त्र, फुलं, नीमपाने, कडुलिंब व साखरेच्या गाठी लावून गुढी उभारली जाते, जी विजय आणि शुभारंभाचे प्रतीक मानली जाते. घराघरात पूजाविधी, नैवेद्य आणि पारंपारिक पक्वान्नांची मेजवानी केली जाते. गावातील लोक नवीन कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देतात आणि वर्षभर समृद्धी व आनंद मिळावा अशी प्रार्थना करतात. गुढीपाडवा म्हणजे परंपरा, आनंद आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे.

स्थानिक मंदिरे

स्वयंभू कुलस्वामी श्री रत्नेश्वर मंदिर, धामणसें

रत्नागिरी तालुक्यात धामणसें गावी मार्गशीर्ष शुक्ल एकादशीपासून पोर्णिमेपर्यंत कुलस्वामी श्री रत्नेश्वराचा वार्षिक महोत्सव सुरु होत असतो. अनेक गावातून हजारो भाविक या उत्सवासाठी अगत्याने येतात. पाच दिवस हा उत्सव चालतो.

धामणसें गाव श्रीक्षेत्र गणपतीपुळे रस्त्यावर गणपतीपुळयापासून अवघ्या पाच / सहा किमी वर वसलेला आहे. तेराव्या किंवा चौदाव्या शतकात या गावाची वसाहत झाली असावी असा अंदाज आहे. संस्कृत शिवभारत ग्रंथात या गावाचा उल्लेख असून गावाने शिवछत्रपती यांना खंडणी दिल्याचा उल्लेख या ग्रंथात नमूद केला आहे.

काही ठळक वैशिष्ट्ये

या स्वयंभू रत्नेश्वराची काही वैशिष्ट्ये आहेत. हे श्री रत्नेश्वराचे मंदिर दक्षिणाभिमुख आहे. दक्षिणाभिमुख मंदिरे भारतात फक्त तीनच आहेत. त्यातील एक कोहापूर जिल्ह्यातील खिंडापूरबुद्रुक गावी व दुसरे ओरीसातील भद्रम गावी आहे व तिसरे धामणसें येथील श्री रत्नेश्वर मंदिर धामणसें गावच्या श्रीरत्नेश्वर मंदिराची आणखी दोन वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे हे शंकराचे मंदिर असून या देवळात नंदी नसणारे शंकराचे एकमेव देवस्थान आहे. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे या देवालयात पार्वतीची मूर्ती नाही. तसेच या मंदिरातील पिंडीवरून सर्प वावरताना आढळतो.

गावाचे मंडळ स्थापन करून गावातील श्रीरत्नेश्वराचा उत्सव आनंदाने व शांततेने पार पडला जातो. श्रींचे उत्सवासाठी १९४७ साली धामणसें ग्रामोत्कर्ष मंडळाची स्थापना करण्यात आली. या उत्सवाचे पारंपारिक रूप कायम ठेऊन सर्व समाज एकत्र यावा व त्यांना भाविकतेने समाधान लाभावे व सर्वांना उत्साह वाटावा असे कार्यक्रम नेहमी आखण्यात येतात. शाळेतील मुले व स्त्रिया यांनाही या उत्सवात सहभागी करून घेण्यात  येते.

हे स्वयंभू श्री रत्नेश्वर भाविकांना पावतात अशी श्रद्धाच नव्हे तर प्रत्यक्ष लोकानुभव आहे. मार्गशीर्ष महिन्यात एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस या देवस्थानचा उत्सव श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि धामणसें ग्रामोत्कर्ष मंडळ मुंबई यांच्या वतीने एकजुटीने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. उस्तव समाप्तीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो.

श्री देव रत्नेश्वर मंदिरामध्ये शिमगोत्सव, श्रावण एक्का, महाशिवरात्र, त्रिपुर लावणे,नियमित रूपे लावणे, असे कार्यक्रम सुरु असून ग्रामस्थांच्या सहकार्याने केले जाते. सोमगंगा नदी च्या कुशीत वसलेले हे मंदिर अतिशय मोहक व विलोभनीय असे आहे.  श्री रत्नेश्वर देवस्थानची दैनिक पूजा श्री भार्गव हरी लिंगायत या कुटुंबिया कडून आजतागायत केली जात आहे.

धामणसे गावातील बौद्धविहार बौद्ध वाडी परिसरात स्थित असून तो परिसरातील बौद्ध समाजासाठी एक महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. येथे भगवान गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारित शांतता, समता, करुणा आणि बंधुता यांचे संदेश दिले जातात. नियमित प्रार्थना, धम्मचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन येथे केले जाते. हा बौद्धविहार केवळ उपासनेचे ठिकाण नसून समाजप्रबोधन, एकता आणि नैतिक मूल्यांचे संवर्धन करणारे केंद्र म्हणूनही ओळखला जातो.

लोककला

धामणसे गावातील लोककला पारंपारिक सण, नृत्य आणि संगीताशी घट्ट जोडलेली आहे. येथे शिमगोत्सव, होळी आणि गणेशोत्सव या काळात पारंपरिक ढोल-ताशा वादन, भजन-कीर्तन, आणि नाच-गाणी ही लोककलांची झलक दिसते. गावात संगीत नाटकांची गौरवशाली परंपरा असून आतापर्यंत सुमारे १५० संगीत नाटके गावातील कलाकारांनी सादर केली आहेत. गावातील तरुण मंडळी शिमग्यात “फेरनाच” आणि “वेशभूषा नृत्य” सादर करतात, तर स्त्रिया पारंपारिक गाणी गातात आणि टिपरी नृत्य देखील उत्साहाने सादर करतात. याशिवाय, कथाकथन, कीर्तन, आणि पारंपरिक वेशभूषेतील नाट्यरूप सादरीकरणे हीसुद्धा धामणसे परिसरातील लोककलांचा भाग आहेत, ज्यातून स्थानिक संस्कृतीचा वारसा पुढे नेला जातो.

स्थानिक पाककृती

धामणसे गावातील स्थानिक पाककृती महाराष्ट्राच्या कोकणाच्या पारंपारिक चवींवर आधारित आहेत. येथे मसालेदार आमटी, सोलकढी, कोकणच्या फिश करी, मोदक, उकडीचे लाडू, कैरी-चटणी आणि वरण-भात यांसारख्या पारंपरिक पदार्थांना विशेष महत्त्व आहे. सणवार आणि उत्सवाच्या वेळी या पदार्थांची खास तयारी केली जाते. समुद्रकिनारी असल्यामुळे ताजी मासळी वापरून बनवलेले पदार्थ आणि कोकम, तिखट व नारळाचे स्वाद या पाककृतींना खास अद्वितीय चव देतात. गावातील प्रत्येक घरात पारंपारिक पद्धतीने स्वयंपाक केला जातो आणि हा स्थानिक वारसा पुढे नेला जातो.

हस्तकला

धामणसे गावातील हस्तकला हा स्थानिक संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. येथे पारंपारिक मातीचे दगडी शिल्प, सुतारकाम, झोपाळ्यांच्या आणि घरगुती सजावटीच्या वस्तूंचे कारागिरी तसेच बांबूपासून कलात्मक बुरुडकाम देखील आढळते. तसेच, मातीच्या गणपती, देवी-देवतांचे मूर्तिकला, रंगीत रांगोळी कला या हस्तकलेतून गावाची सांस्कृतिक ओळख दिसून येते. या कला-हस्तकलेमुळे धामणसे गावाची परंपरा, कलात्मक कौशल्य आणि स्थानिक वारसा जतन होतो.